MARG Institute For SELF Development

MARG Institute For SELF Development

Share

समस्येपासून ते उत्तरापर्यंतचा प्रवास

16/08/2023

*मना तळमळसी..! लेखांक 10.*

मुलांचा *"व्यक्तिमत्त्व विकास"* हा विषय आज-काल मुला-पालकांच्या मानगुटीवर भुतासारखा बसलेला दिसतो. आपण मुलांसाठी, जास्तीत जास्त काय काय करू शकतो, कोणकोणत्या सोयी सुविधा त्यांना आपण पुरवू शकतो, त्यांच्यासाठी किती पैसे खर्च करू शकतो, हे प्रश्न म्हणजे आपल्या मुलांवरील प्रेमाच्या फूटपट्ट्या झाल्या आहेत. या सर्व भौतिक सोयीसुविधा, महागडे क्लासेस, सुट्टीतील छंदवर्ग, या गोष्टींपुरतेच फक्त, आपले त्यांच्या विकासासाठीचे प्रयत्न मर्यादित आहेत का? आणि हे केलेले प्रयत्न पुरेसे आहेत का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी मुळातूनच मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया समजून घ्यायला पाहिजे.
बरेचदा आपल्याला, *'व्यक्तिमत्त्व'* या शब्दाचे नीट असे आकलन झालेलेच नसते. काही ढोबळ कल्पना आपण मनात धरून चालतो. काही जण माणसाच्या बाह्य रूपालाच व्यक्तीमत्व असे म्हणतात. काही जणांना असे वाटते की, अनेक गोष्टी अवगत असणे म्हणजे चांगले व्यक्तिमत्त्व. म्हणून मग मुलांना अनेक गोष्टी शिकवण्याचे अट्टहास दिसतात. स्केटिंग, गिटार, चित्रकला, गायन, तबला, वक्तृत्त्व, पोहोणे, पियानो, आणि जोडीला पुन्हा शाळेचा अभ्यास असतोच. अशा भारंभार क्लासेसना दिवसभर हजेरी लावून, मुलांचे चिमुकले शरीर, चिमुकला मेंदू, आणि चिमुकले मन, अगदी पार शिणून, दमून जातात. इतके की, शेवटी एवढं सगळं करूनही, मुलांच्या पदरात काहीच पडत नाही.
चटपटीत इंग्रजी बोलता येणे, आणि नवीन माणसांशी धीटपणे संवाद साधता येणे, म्हणजे चांगले व्यक्तिमत्व, असे काहींना वाटते. त्यातूनच मग ...
"कॉन्व्हेंट मधली मुलं कशी स्मार्ट होतात, त्या मानाने मराठी शाळेतील मुलं अगदीच घाटी वाटतात नाही"
-असे सार्वत्रिक गैरसमज पसरतात. या सर्व गोष्टी व्यक्तिमत्त्वात समाविष्ट असतातच. पण अशी एखादीच गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्त्व, असे म्हटल्यास, आंधळे आणि हत्ती या गोष्टी सारखे होईल. व्यक्तिमत्त्व ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. तांत्रिक व्याख्येत न अडकता, आपण ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू.
*"व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक अशा सर्व वैशिष्ट्यांचा संच म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व."* या संचात शारीरिक वैशिष्ट्यांचा समावेश असतोच. पण त्यांना अगदी थोडे महत्त्व असते. व्यक्तिमत्त्वातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे व्यक्तीच्या वर्तन वैशिष्ट्यांचा. माणसाच्या एकूणच क्रियात्मक, आणि प्रतिक्रियात्मक वर्तन वैशिष्ट्यांचा संच, म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्त्व असं म्हणता येईल.
आपल्या आसपासच्या लोकांशी माणूस कसा वागतो, समूहात त्याला इतरांशी जमवून घेता येतं का? अनोळखी माणसांशी सामना झाल्यास त्याची वागण्याची पद्धत कशी असते? जेव्हा मनाविरुद्ध घटना घडतात तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असते? ताणतणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगात तो कसा वागतो? त्याला स्वतःच्या भावना नीटपणे स्पष्ट शब्दात व्यक्त करता येतात का? या सगळ्या गोष्टी नीटपणे करता येणे हे विकसित व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे.
मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची सर्वात मोठी शाळा म्हणजे घर. आणि त्यासाठी तयार, उपलब्ध असणारी 'आदर्श मॉडेल्स' म्हणजे आई आणि बाबा. आईबाबा मुलांशी कसे वागतात, आईबाबा मुलांच्या देखत एकमेकांशी कसे वागतात, आणि आईबाबा मुलांदेखत इतरांशी कसे वागतात, या सर्व वागण्याच्या पद्धती म्हणजे मुलांसाठी व्यक्तीमत्व विकासाचे धडे असतात. या प्रक्रियेला विकास म्हणण्यापेक्षा खरे तर व्यक्तिमत्त्वाची घडण असे म्हणणं अधिक अर्थपूर्ण होईल. मुलं शिकतात कशी..? हा एक मुळातूनच समजून घेण्याचा विषय आहे. एखादी घटना पाहणे, अनुभवणे, ती समजून घेणे, तिचा अर्थ लावणे, आणि नंतर तसाच प्रसंग जेव्हा त्यांच्या आयुष्यात घडेल, तेव्हा त्याला तोंड देताना, मागच्या प्रसंगात मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करणे, अशी ही प्रक्रिया असते. एका उदाहरणाने ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल.
नऊ वर्षांच्या अभिजीतच्या बाबांच्या मित्राला त्यांच्या मदतीची गरज होती. त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादात, त्यांची बाजू मांडून मध्यस्थी करण्यासाठी, त्यांनी अभिजीतच्या बाबांची मदत मागितली. बाबांनी होकार दिला, आणि या रविवारी आपण जाऊ म्हणून कबूल केले. पण त्याचवेळी बाबांना आपण अभिजीतला दिलेल्या प्रॉमिस चा विसर पडला. रविवारी आपण जवळच्या किल्ल्यावर पिकनिकला जाऊ, असे प्रॉमिस बाबांनी अभिजीतला आणि त्याच्या आईला केले होते. पण चुकून, त्यांनी मित्रालाही, त्याच रविवारची सकाळची वेळ दिली. मग ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळीच त्या काकांचा फोन आला. घरात त्यावेळी पिकनिक ची तयारी चालू होती. मोबाईल मध्ये त्यांचा फोन आलेला पाहून, बाबांना, झालेला गोंधळ लक्षात आला. मग त्यांनी काय केले...?
प्रथम, त्यांनी आलेला फोन अभिजीतच्या आईला घ्यायला सांगितला. अभीचे बाबा टॉयलेट मध्ये आहेत, दहा मिनिटांनी फोन करतील असे सांगायला सांगितले. मग त्यानंतर त्यांनी अभि, आणि त्याची आई यांना, झालेला गोंधळ, व्यवस्थित विश्वासात घेऊन सांगितला. स्वतःची चूक कबूल करून, त्याबद्दल सॉरी म्हटले. आणि आपल्या पिकनिकपेक्षा, काकांचं काम कसं महत्त्वाचं आहे, हे त्यांना समजून सांगितलं. अभि अगोदर नाराज झाला, पण पुढच्या रविवारचं प्रॉमिस मिळाल्यानंतर राजी झाला. मग बाबांनी मित्राला फोन करून त्यांचा पुढचा कार्यक्रम ठरवला.
आता या प्रसंगातून, अभिजीत काय काय शिकला असेल? अनेक गोष्टी आहेत. अशा प्रसंगांची नोंद आपल्या मेंदूत, नेणीवेच्या पातळीवर होत असते. अभिजीतने शिकलेल्या गोष्टींपैकी, पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या हातून काही चूक झाल्यास, ती कबूल करावी. अजिबात लपवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे, झालेली चूक निस्तरण्यासाठी, आपल्या माणसांकडे मोकळ्या मनाने मदत मागावी. संकोचू नये. तिसरी गोष्ट म्हणजे, घरात दिलेला शब्द महत्त्वाचा असतोच, पण समाजात दिलेल्या शब्दाला कधी कधी जास्ती महत्त्व द्यावे लागते.
थोडा बारकाईने विचार केल्यास, असे लक्षात येते की, यातल्या काही गोष्टी फारच महत्त्वाच्या आहेत. गंभीर आहेत. वरील प्रसंग जरी छोटासा असला, तरी त्यातल्या काही गोष्टींमुळे मिळणारा धडा, हा आयुष्यामध्ये, अतिशय गंभीर अशा समस्या सोडवताना, योग्य पद्धतीने विचार करण्याची, आणि वागण्याची सवय लावणारा आहे. गेल्या काही वर्षात, शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणात, ही गोष्ट महत्त्वाची होती. या मुलांच्या घरातील वातावरण असे असावे की, त्यांना तशी मदत मागण्याची हिंमतच झाली नसावी. किंवा त्यांना तशी खात्री वाटली नसावी. स्वतःची चूक कबूल करणे, आपण अडचणीत असताना आपल्याच माणसांकडे न घाबरता मदत मागणे, अशा सवयी माणसाला संकट काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे मदतीच्या ठरू शकतात. मदत मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, असं वाटल्यासच माणूस अगदी अगतिक होतो. आणि तेव्हाच तो आत्महत्या सारख्या गंभीर पर्यायाची निवड करण्याची शक्यता निर्माण होते.
______________________________
-- *विवेक दसरे.*
*मानसतज्ञ.*
*मार्ग इन्स्टिट्यूट फॉर सेल्फ डेव्हलपमेंट,*
*अहमदनगर.*
*9881659901*

09/04/2023

मार्ग इन्स्टिट्यूट आयोजित करत आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव वर्कशॉप.....!

आपल्या करिअर विषयी जागरूक असणाऱ्या, आजच्या विद्यार्थ्यांना, स्वतःचे करिअर यशस्वीपणे घडवण्यासाठी,
" स्व " विकास साधण्यास मदत करणारे...
एक परिपूर्ण वर्कशॉप..!
Develop Your Career...
By ... Developing Your "SELF"

वैशिष्ट्ये --
• परिपूर्ण, मूलभूत अभ्यासक्रम.
• कौशल्य विकासावर भर.
• अतिशय मर्यादित प्रवेश

स्वतःचे करिअर यशस्वीपणे घडवण्यासाठी आजचं कॉल करा
098816 59901

10/02/2023

*मना तळमळसी..! लेखांक ७.*
*विवाहपूर्व समुपदेशन .*
माणसाने काही फारच सुंदर गोष्टी निर्माण केल्या आहेत. नातेसंबंध ही त्यातलीच एक फार सुंदर गोष्ट आहे. एरवी माणसाला बंधने आवडत नाहीत. तो स्वातंत्र्य - प्रिय प्राणी आहे. पण अगदी 'दागिन्याप्रमाणे मिरवावे' असे बंधन म्हणजे लग्न. 'आई आणि मूल' हे नैसर्गिक नातं सोडलं, तर निसर्गातील दुसरे एकमेव आदिम आणि नैसर्गिक नातं म्हणजे 'नर आणि मादी.' हे खरंतर केवळ जीवशास्त्रीय नातं आहे. पण उत्क्रांतीच्या आणि सामाजिकरणाच्या प्रक्रियेत, नर आणि मादी या आदिम, जीवशास्त्रीय नात्याला माणसाने व्यवस्थेच्या, आणि असीम प्रेमाच्या कोंदणात बसवून, सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवलं आहे. जणू मानवी संस्कृतीचा तो परमोच्च बिंदूच मानावा.
एकमेकांसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याची बांधिलकी बांधणारे, 'पती-पत्नी' हे नाते आहे. लग्न हे माणसाच्या आयुष्यात घडणारे सर्वात मोठे स्थित्यंतर आहे. बाकीची नाती ही रक्ताची असतात. आई-वडील, भाऊ बहीण, ही सर्व अशी रक्ताची नाती. लग्नापूर्वी, या आपल्या माणसांसह राहताना, त्यांना 'आपलं' मानावं लागत नाही. ती माणसं आपली असतातच. पण लग्न ही अशी घटना असते, की जी, संपूर्णपणे परक्या असणाऱ्या एका व्यक्तीला, तुमच्या सर्वात जवळ आणून ठेवणार असते. या ठिकाणी 'आपलं मानणं' म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं असतं.
पती-पत्नी या नात्यात असणारी समर्पित अशी बांधिलकी दुसऱ्या कोणत्याच नात्यात आढळत नाही. माणूस आई-वडिलांची सेवा करतो, भाऊ बहिणीवर प्रेम करतो. पण ही नाती एकतर आयुष्याच्या एका टप्प्यावर संपणार तरी असतात, किंवा त्यांच्या संदर्भातील आपली जबाबदारी काही प्रमाणात मर्यादित होणार असते. पण बहुतांश संस्कृतींमध्ये पती-पत्नी हे नातं आयुष्यभर निभावलं जाणारं नातं आहे. लग्न करताना, या नात्याच्या व्यापकतेची, खोलीची, एक प्रगल्भ जाणीव निर्माण होणे आवश्यक असते. नाहीतर अनेक अडचणी निर्माण होतात.
लग्नामुळे माणसाचं आयुष्य संपूर्णपणे बदलत असतं. कालपर्यंत पूर्णपणे स्वच्छंद जगणारे, तरुण मुलगा आणि मुलगी, अचानक एकमेकांशी पती-पत्नीच्या नात्याने बांधले जातात. काया, वाचा, मन, अशा सर्व पातळीवर एकमेकांना स्वीकारून, धर्म, अर्थ, काम, अशा सर्व क्षेत्रात सहजीवनाचे वचन घेऊन - देऊन, लग्नाचे बंधन स्वीकारले जाते. या नात्यामुळे निर्माण होणाऱ्या जबाबदाऱ्या ओळखून, स्वीकारून, पार पाडण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीला स्वतःमध्ये अनेक बदल घडवावे लागतात. काही जणांमध्ये हे बदल अगदी सहज घडतात. तर अनेक जणांमध्ये हे बदल घडताना रेल्वेचे रूळ बदलताना होते तशी, काहीशी खडखड सुद्धा होते. हे अगदी नैसर्गिक असते.
माध्यम क्रांतीमुळे, संपूर्ण जग, पूर्वी कधी नव्हे एवढे जवळ आलं आहे. जगातील अनेक वेगवेगळ्या संस्कृतींचा प्रभाव, आजच्या पिढीच्या जगण्यावर थेटपणे पडतो आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या 'मतामतांच्या गलबल्यात' नेमके काय बरोबर, आणि काय चूक, हे ठरवणे, तरुणांसाठी जास्त जिकिरीचे होत आहे. लग्नाच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती आहे. लग्नामुळे निर्माण होणाऱ्या नात्याचा, आणि जबाबदारीचा स्वीकार करून, ती पेलण्यासाठी, पूर्वी कधी नव्हे एवढी, मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. विवाहपूर्व समुपदेशनाच्या रूपाने असे मार्गदर्शन आज उपलब्ध होत आहे.
समाजातील अनेक गोष्टी आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत. त्यांचा परिणाम वैवाहिक नात्यांवर सुद्धा होतो आहे होतो आहे.उदा. 'लिंग भूमिका'. पूर्वी प्रत्येक संस्कृतीत व्यक्तीच्या लिंगावरून तिच्या कुटुंबातील भूमिका निश्चित होत असत. पुरुष आणि स्त्रीच्या भूमिका ठरलेल्या असत. त्यामध्ये बदलाचा प्रश्न फारसा उद्भवत नव्हता. पुरुष-प्राधान्य बहुतांश स्वीकारलेले होतेच. पण आधुनिक काळात, सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत, स्त्री-पुरुष समानता हा नव्याने पुढे आलेला मुद्दा आहे. अजूनही, समाज पुरुष-प्राधान्य मानत असला, तरी, समानतेचा विचार मांडला जाऊन, काही प्रमाणात आचरणातही येत आहे. म्हणजेच हा बदलाचा आणि संघर्षाचा काळ आहे. त्यामुळे आपल्या होणाऱ्या जोडीदाराचे या संबंधातील विचार, आणि अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेणे, (लग्नापूर्वीच) आवश्यक झाले आहे.
लग्न-संबंधातील अनेक विषय असतात, की ज्याबाबत समुपदेशकाच्या मदतीने अगोदर चर्चा केली, तर ती फारच मार्गदर्शक होऊ शकते. लग्न आणि जोडीदार या संदर्भातील आपल्या कल्पना, अपेक्षा, आणि प्रत्यक्षातील वास्तव, या दोन्हीत जर तफावत असेल, आणि ती भरून काढता आली नाही, तर लग्नानंतर आयुष्यात दुःखच निर्माण होते. आजकाल चित्रपट क्षेत्राच्या प्रभावामुळे तरुणांच्या, -आणि तरुणींच्या सुद्धा, प्रेमाबद्दलच्या कल्पना, कधीकधी फारच स्वप्नाळू असतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र कठोर वास्तव असते. लग्न, लग्नानंतरचे आयुष्य, सासरची नवीन नाती, त्या नात्यामुळे येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या, त्या संदर्भातील समाजात असणाऱ्या अपेक्षा, प्रत्यक्ष नवदांपत्याच्या इतरांकडून, आणि एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा, नवीन घरातील वातावरण, इत्यादी अनेक गोष्टी समुपदेशकाच्या मदतीने जाणून घेतल्यास, ते फारच उपयोगाचे ठरू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्न, आणि आपला साथीदार, याबद्दलचा आपला नेमका दृष्टिकोन, (शास्त्रीय शब्द- अभिवृत्ति, attitude) काय आहे, याबद्दल बऱ्याच जणांना जाणीवच नसते. समुपदेशकाबरोबर केलेली चर्चा या संदर्भात उपयोगाची ठरते.
अजून अनेक विषयात समुपदेशन मार्गदर्शक ठरू शकते. उदाहरणार्थ एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, स्वभाव, दोन्ही घरातील मूल्यकल्पना, नात्यातील बांधिलकीच्या, एकनिष्ठतेच्या कल्पना, समायोजन कौशल्ये, मुले कधी होऊ द्यायची, त्यांचं पालनपोषण, आर्थिक परिस्थिती, आणि भविष्यातील आर्थिक नियोजन, जोडीदारावर प्रेम करण्याच्या संकल्पना, आणि अपेक्षा, जोडीदाराची भावनिक वैशिष्ट्ये, धार्मिकतेच्या कल्पना, अशा अनेक विषयांची चर्चा होऊ शकते.
लग्न करू इच्छिणाऱ्या मुला मुलींच्या दृष्टीने, अतिशय महत्त्वाचा, आणि अतिशय नाजूक असा विषय म्हणजे, त्यांचे विवाहोत्तर लैंगिक सहजीवन. लैंगिक संबंधांबद्दलचे घोर अज्ञान, आणि त्याबद्दल अनेक भोंगळ, अतिरकी कल्पनांची कडबोळी बाळगणारा तरुण वर्ग, हे आपले सामाजिक वास्तव आहे. लैंगिक संबंधांबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती, लैंगिक सहजीवन, याचा पती-पत्नीतील भावनिक नात्यावर पडणारा प्रभाव, या सर्व गोष्टी, खरे तर प्रत्येक विवाहेच्छुक जोडप्याने, समुपदेशकाकडे जाऊन जाणून घेतल्या पाहिजेत. ज्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतात, अशांपैकी बहुतांश संघर्षांच्या मुळाशी लैंगिक जीवन हेच कारण असते. त्यामुळे एवढ्या महत्त्वाच्या, आणि नाजूक विषयावर समुपदेशकाशी मोकळेपणाने चर्चा करणे नेहमी व अतिशय फायद्याचे ठरते.
विवाहपूर्व समुपदेशन हे अशा प्रकारे सुखी आणि समाधानी वैवाहिक आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून उपयोगी पडू शकते.
-- *विवेक दसरे.*
*मानसतज्ञ.*
*मार्ग काउन्सिलिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर,*
*अहमदनगर.*
*9881659901*

Want your business to be the top-listed Business in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

"Vineet", MangalHousing Society , Opp. Sanjay Super Market , Gulmohar Road, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 9am - 11am
5pm - 8pm
Tuesday 9am - 11am
Wednesday 9am - 11am
5pm - 8pm
Thursday 9am - 11am
Friday 9am - 11am
5pm - 8pm
Saturday 9am - 11am
Sunday 9am - 1pm