Yugkranti.live

Yugkranti.live

Share

news website

30/09/2023

गावातील शिक्षणाची बिकट झाली वाट

जेंव्हा होती एक शिक्षकी शाळा
उभा दोन पायावर लाकडी फळा
काळया फळयावर पांढरा खडू
विध्यार्थी लागायचे चाणक्ष घडू ll

आता बहुशिक्षकी झाली शाळा
पाय मोडून पडला फळा
खडूफळयाला दिला निरोप
साईन बोर्डच लावल रोप ll

शिकवायचे सारे विषय एकच शिक्षक
विध्यार्थ्यावर असयाच बारकाईन लक्ष
होता विध्यार्थ्यांना शिक्षकाचा आदर
खालची मान करीत नव्हते सहसा वर ll

असायचा शाळेचा अभिमान नि लळा
विध्यार्थी शिकत मानव बनन्याचा धडा
आता फळा झाला व्हाईट बोर्ड
तरी मुलांना लिहितावाचता येईना धड ll

वर्गाच्या भिंतीवर आला स्मार्ट टिव्ही
मुल टिव्ही कडे नुसते बघत राही
सुविधा भरपुर कमी झाल अवधान
लागतालागेना मुलांच अभ्यासात मन ll

गेला गुरुजीचा आदर गुरुजी झाले सर
अभ्यासाशिवाय मुल इतर कामात हुशार
मुल झाली स्मार्ट,अभ्यासाकडे पाठ
गावातील शिक्षणाची बिकट झाली वाट ll

24/09/2023

#कथा

महाप्रसाद !

" अग्गे काय बोल्तूय तुला काय ऐकाय येतय का ? च्या टाक की वाईच. समदी कवाची जमायली असतील मांडवात. गणपती मंडळाची मीटिंग सुरु झायली असलं तिथं "

रामाने पडवीतुनच रागारागाने बायकोला हाळी दिली.त्याच्या आवाजातली तिडीक जेवढी जास्त होती तेवढ्याच तिरिमिरित जयश्री, रामाची बायको स्वयंपाकघरातून माजघरात आणि माजघरातून पडवीत पाय आपटतच आली आणि हात फिरवत रामाला बोलली.

'जरा वाईच आत य़ा आणि मोकळी डबडी बघा. आठ दिस झालं साखार सपली च्यापूड सपलीय़ा तुमचं ध्यान हाय का घरात '

"अग पंधरा दिसाआधीच आण्ल्याली हुती की .. का खातीस का काय रोज चमच्या चमच्या"

'व्हय आता तेव्हडेच राहीलवत. पैसा आलाय का गेल्या चार महिन्यात घरात. ह्यो दुष्काळ आधी पाचवीला पुजलाय. घरात नाय भाकरीला पीठ आन ह्ये निघालं लष्कराच्या भाकर भाजाया "

निरुत्तर होऊन रामाने खुंटीला अडकवलेली गांधी टोपी कपाळाला लावून डोक्यावर घातली अन पायात निम्मी अधिक झिजलेली कोल्हापुरी सरकावून तो दरवाजाच्या बाहेर पडला. मधल्या आळीतून बाहेर पडून तूक्याच्या घराला वळसा मारून तो चावडीपुढे आला. चावडीपुढे गणपतीचा मोठा मांडव घातलेला. आतमध्ये सिंहासनावर आरूढ झालेली मोठीच्या मोठी गणपतीची मूर्ती आणि त्याला तेवढाच मोठा झेंडुच्या फुलांचा हार घातलेला. सगळ्या मंडपात कापराचा आणि उदबत्तीचा वास भरून राहिलेला. नुकतीच बाप्पांची आरती झालेली. देवळातल्या हरीकाकांचा मुलगा सगळ आवराआवरी करायच्या नादाला लागलेला. आदल्या दिवशीच निर्माल्य फुलं दुर्वा एका पिशवीत तो भरत होता. दिनकर गुरुजींच्या घरातून आलेला मोदकांचा प्रसाद दोन तीन लहान मुले मोठ्या उत्साहाने सगळ्यांना वाटत होती. आठ दहा पोरं उगीचच त्यांच्या मागे मागे फिरत होती. जरा मोठी झालेली आणि तालुक्याला कॉलेज मध्ये जाणारी एक दोघे माईक आणि स्पीकर चा ताबा घेवून बसली होती. एक ही गाणे नीट ऐकू द्यायचे नाही असं जणू ठरवूनच एक कडवे झालं की दुसरं गाण लावत होती. बाबुराव पासून ते शांताबाई पर्यंत सगळ्यांना वेठीस धरल्यानंतर अरे जरा देवाची गाणी लावा असं कुणीतरी ओरडले आणि त्याच गाण्यांच्या चालीवर गणपतीची रिमिक्स गाणी कुणीतरी सुरु केली.

अशातच मग मंडळांच्या अध्यक्षांनी स्पीकरच बंद केला आणि पोरांना हुसकावून लावून ते सदस्यांना बोलले

"आरं चला लवकर मीटिंग आटपून घेवूया संध्याकाळी महाप्रसाद आहे त्याचं नियोजन करू य़ा"

सगळे लगबगीने मांडवातल्या सतरंजी वर बसले रामा सुध्दा एका खांबाला टेकला.

" मला असं वाटत की आपण पुलाव भात वांग्याची भाजी आमटी अन गोडाचा शिरा असा बेत करूया "

हणमा तात्यांनी विषयाला सुरवात करुन दिली आणि कुठलीही चर्चा ना होता मेन्यु ठरला आणि कुणी काय काय द्यायचे आचारी कोण ठरवायचे टेबल खुर्च्या पाणी य़ा सगळ्या गोष्ठीचे कार्य वाटप आणि समन्वयाची जबाबदारी रामावरती देण्यात आली.

रामा म्हणजे त्या गावातील अश्या कामात तरबेज असलेला एक सामाजिक व्यक्तिमत्व. घरी अठरा विश्व दारिद्र्य पण सामाजिक कार्यात पहिला वाटा जर कोणाचा असेल तर तो रामाचाच ! मीटिंग संपताच सगळे जन आपापल्या कामाला निघून गेले अन रामाने नियोजनाची सगळी व्यवस्था हातात घेतली. त्याला मदत करायला गावातील तरुण कार्यकर्त्यांची फौज तयारच होती.

"सत्या चल तु कुणी कुणी काय काय द्यायचे ठरवलया त्याची लिस्ट घे काढुनशान आन गावातल्या त्या किराणावाल्या कडन गरा साखार तांदूळ त्याल आन लागत्याल ते समदे मसाल्याचे पदार्थ घेवूनशान ये शैल्या तु गाडी काढ आन तालुक्याला जावून तूप काजू बदाम समद्याची येवस्था कर तोपावतूर म्या उडप्या च्या हाटीलात जावून आचारी ला घेवून येतू "

सगळ्यांना कामाला लावून मंडप वाल्याकडुन टेबल खुर्च्यांची व्यवस्था करुन रामा आचारी ला आणायला स्टँडवर हॉटेल मध्ये गेला सुध्दा जातानाच माळ्याच्या शुध्द जल केंद्रात पाण्याचे पिंप ही सांगून ठेवले. माईक वरून सगळ्या गावाला संध्याकाळी सात वाजता महाप्रसादाला येण्याचे जाहीर आवाहन करायला ही तो विसरला नाही.

मध्येच रामाची बायको त्याला जेवायला बोलवायला आली

"अव कायतरी कोरड्यास भाकर खावून घ्या शेजारच्या कडून दोन चार दिवसाच पीठ आणलंय उधारीव चला दोन घास खावून घ्या"

रामा आणलेल्या पदार्थांची पोती रचून ठेवत होता तो म्हणला

"अग बघतीयास न्हवं मुलखाची कामं पडल्यात आजून आन तुला जेवायचं पडलंय व्हय सात पावतूर माणसं येत्याल तंवर समदी येवस्था झायली पाहीजे जा तु "

जयडी बिचारी हिरमसूण मागे फिरली अन रामा तेलाचे अन तुपाचे डबे फोडून वांग्याची पाटी बायकापुढे सरकावून कामाला लागला. गल्लीतल्या झाडून सगळ्या बायका भाजी कापायला आणि बाकीची तयारी करायला त्याने बोलावून आणल्या. घराकडं निघालेल्या आपल्या बायकोलाही त्याने हाक मारली आणि दोन दोन किलो काजू बदाम तिच्या हातात देवून तो बोलला

"हे घे काजू अन बदाम गोडाच्या शीऱ्यात घालायला काप करुन दे आन हे बघ आपल्याव इस्वासान ही जबाबदारी दिल्या पोरास्नी लांब ठेव नायतर तोंडात टाकत्याल"

सकाळपासून चहा देखील न पिलेल्या आपल्या नवऱ्याकडे जयडी बघतच राहिली.

तोपर्यंत रामा उडप्याच्या हाताखाली मोठी मोठी पातेलं तीन दगडांच्या चुलीवरती चढवण्याच्या कामाला लागला होता. चुलीवरती भात शिरा रटरटत होता दुसऱ्या चुलीवरती आमटी चा चांगलाच सुगंध दरवळत होता. संध्याकाळचे सात वाजत आलेले दोन चार जणांच्या मदतीने रामाने सगळी मोठी मोठी पातेली खाली उतरवून ठेवली. त्यावरती मोठी मोठी झाकणे ठेवली आणि तो बाहेर टेबल आणि खुर्च्या मांडायच्या कामाला लागला. गल्लीच्या य़ा टोकापासून त्या टोकापर्यंत जेवणाची टेबले मांडून त्याच्या मागे ओळीत खुर्च्या ठेवून त्याने सगळ्या टेबला वरती मंडपवाल्या कडून आणलेली पांढरी टेबल क्लौथ्स टाकायला सुरवात केली. आता पुन्हा गल्लीतल्या पोरांनी माईकचा ताबा घेतला होता. प्रत्येक जण आपापल्या पध्धतीने माईक वरून महाप्रसादाची वेळ जवळ आल्याची माहिती सगळ्या गावाला देत होते. तेव्हड्यात मंडळाचे अध्यक्ष सरपंच आणि काही प्रतिष्ठित लोकं मांडवात येताच तयार झालेल्या पदार्थाच्या ताटाचा गणपतीला नैवद्य दाखवण्यात आला. सकाळपासून एवढ्या जणांनी कामं करुन बनवलेल्या नैवद्याचे ताट गणपतीसमोर बघून रामाला स्वता उपाशी राहून केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. आरती सुरु होताच लगेच रामाने पाच सहा मुले हाताशी घेतली आणि त्याने हातासरशी वाढपाचे सगळे नियोजन करुन टाकले. आरती झाली आणि घराघरातून बायका पोरासह कुटुंब च्या कुटुंब खुर्च्यावरती येवून बसू लागली. रामाने कुणाच्या हातात पुलावाची पाटी कुणाच्या हातात आमटीची बादली कुणाकडे पाण्याचा जग तर स्वता गोडाच्या शिऱ्याची पाटी घेवून पंगतीच्या पंगती उठवायला सुरवात केली. लोकांची नुसती झुंबड उडाली. लोकं टेबलावरती तुटून पडले एक पंगत अजून जेवते आहे तोवर खुर्च्यांच्या मागे पुढची पंगत तयार राहू लागली. रामाने नियोजन इतके सुंदर केले होते की जेवण होताच तातडीने उष्टी पत्रावळी उचलली जावून पुढची पत्रावळी टेबला वरती यायची. दहा हात असल्यासारखा रामा कामं करत होता. कामं करता करताच गर्दीत उभा असलेल्या जयडी ला त्याने हातानेच जेवून घ्यायची खूण केली. पण सकाळ पासून नवरा जेवलेला नसताना जेवेल ती जयडी कसली ? तिने पोरांना पंगतीला बसवले आणि ती पत्रावळी उचलायच्या कामाला लागली. सात साडे सात ला सुरु झालेल्या पंगती रात्री दहा साडे दहा पर्यंत सुरूच होत्या. जेवण करुन हात धुतले की सगळे जण रामाला सुंदर नियोजन केल्याबद्दल शाबासकी देत आणि हातावर रामाने ठेवलेली बडीशेप तोंडात टाकत घरचा रस्ता धरत. रात्रीचे साडेअकरा वाजले सगळ्या पातेल्यानी अगदी तळ गाठला. शेवटी पालेल्याचे तळ खरडून खरडून रामाने शेवटची पंगत वाढली. सगळे गावकरी कार्यकर्ते तृप्त होऊन घरी परतले. आणि त्यांच्या तृप्तीचे समाधान स्वताच्या चेहऱ्यावरती घेवून रामा मांडवातल्या सतरंजीवर ऊपरण्याने घाम पुसत टेकला. मांडवात आता हजारो जनाना भरपेट जेवू घालून स्वता उपाशी असलेले, रामा जयडी आणि गणपती, तीघेच जण होते. जयडी रामाच्या शेजारी येवून बसली.

"सकाळधरन च्या चा घोट बी नाय ओ तुमच्या पोटात. आणि किती राबशीला. एव्हड्याजनास्नि वाढलसा दोन घास खाऊन तर घ्यायच."

अग असं कसं बोलतीयास महाप्रसादाची जबाबदारी व्हती आपल्यावर..सगळ्याच्या मुखात प्रसाद गेल्याबगीर आपल्या तोंडात कसा घास घ्याचा"

"आव पण आता सपल की समद आता रव्हा उपाशी"

वैतागून जयडी तिथून उठली रामा तिला समजावत बोलला

"जयडे रागवू नगस उपास काय आपल्या पाचवीलाच पूजलाय बघ. पण म्हणून काय आपल्या जबाबदाऱ्या मोडायच्या काय माणसांचा इसवास तोडायचा का ? मानसासनी प्रसाद मिळावा म्हणून आपल्या हातात दिलेला ना लोकांनी मग त्यो आपणच आधी खायाचा ? जयडे आपला आपल्या इमानावर इस्वास हाय. य़ा देवावर इस्वास हाय. या देवाने जलम दिलाय नव्हं मग या चोचीतला दाणा पण त्यौच दीयील बघ चल जावू घराकडं "

दोघांनीही गणपतीला नमस्कार केला. गणपती शांतपणे त्यांच्याकडे पहात होता. रात्रीचे बारा वाजलेले. वातावरणामध्ये नीरव शांतता होती. मंडपातल्या हॅलोजन च्या दिव्याभोवती पतंगाची दाटी झाली होती. दोघेही पोटात भूक घेवून तृप्तीने परत फिरले. शेवटची आवराआवर करायला देवळातले हरीकाका मांडवात आले होते. रामा आणि जयडी मांडवाच्या कमानीतून बाहेर पडत असतानाच हरीकाकांची हाक त्यांच्या कानांवर पडली अन ते परत आले. हरीकाका म्हणाले

"अरे हे गणपतीच्या नैवेद्याचे ताट घेऊन जा घरी आणि खावून टाका खराब होइल ते "

रामाने थरथरत्या हाताने ते नैवेद्याचे ताट हातात घेतले. जयडी डोळ्यात पाणी आणून रामाकडे पहात होती. चोच दिलीय त्योच घास देईल रामाचं मघाच वाक्य अश्रूवाटे तिच्या डोळ्यातून वहात होतं. स्वतःचा नैवद्य त्यांच्या मुखात घालून गणपतीच्या चेहऱ्यावर महाप्रसादाची तृप्ती झळकत होती.

31 लाखांचा गुटखा पकडला ; महारुद्र मुळेसह तिघांवर ग 30/07/2023

31 लाखांचा गुटखा पकडला ; महारुद्र मुळेसह तिघांवर गुन्हा !

31 लाखांचा गुटखा पकडला ; महारुद्र मुळेसह तिघांवर ग गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई, 46 लाख 28 हजाराचा ऐवज जप्त

Want your business to be the top-listed Media Company in Bhir?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Ashok Nagar Barshi Naka Beed
Bhir
431122