Karvir Riyasat

Karvir Riyasat

Share

शिवरायांचा विचार व वारसा जपणाऱ्या शिवछत्रपतींच्या वंशजांची कोल्हापूर गादी... करवीर रियासत While the states of Baroda, Gwalior, Indore etc.

28/09/2025

…आणि लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी तथाकथित सरकार मंडळींचा माज उतरवला !

धामधुमीच्या काळात अनेक सरदार घराण्यांनी तलवार हाती धरून राज्याची सेवा केली. युद्धकाळ संपला आणि राज्ये स्थिर झाली तेव्हा सरदार गेले आणि कोल्हापूर राज्यात “सरकार” म्हणवून घेणारा नवीनच प्रकार उदयास आला. या तथाकथित सरकार मंडळींनी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना राज्यकारभारात व सामाजिक चळवळीत अतोनात त्रास दिल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आढळतात. खुद्द छत्रपतींनाच त्रास देणारे आणि सदासर्वकाळ दरबारी तोऱ्यात फिरणारे हे लोक सामान्य जनतेची किती पिळवणूक करत असतील, याला काही अंदाजच नाही.

राजर्षी शाहू महाराज छत्रपतींच्या गादीवर येण्यापूर्वीचे अर्धे शतक कोल्हापूर राज्यास अल्पवयीन व अल्पायुषी छत्रपती राहिल्याने छत्रपतींचा अंमल कमी होऊन या सरकार मंडळींनी आपले प्रस्थ बरेच वाढविले होते. छत्रपतींच्या दरबाराप्रती यांची बेपर्वाई वाढलेली होती. यापैकी कित्येकजण दरबारावर शक्य असेल त्या मार्गाने कुरघोडी करण्यास झटत होते. दरबाराच्या मार्गातील हे काटे राज्यकारभाराच्या कामी जरी येत नसले तरी ते जाचक होऊ नयेत, याकडे महाराजांनी लक्ष दिले. या सरकार मंडळींची मिजासी व चढेलपणामुळे यांना राज्यकारभारातून दूर ठेवून सर्वसामान्य मराठा व इतर समाजांतील शिक्षित तरुणांना अधिकारी पदांवर घेऊन शाहू महाराजांनी राज्य चालविले होते. तसेच, महाराष्ट्रातील ग्राम व्यवस्थेत पाटील हा अनुवंशिक पुढारी गणला जायचा. पाटील हा खेड्यातील मुख्य अधिकारी असून, त्या गावातील शेतकरी वर्गापैकीच तो एक असल्याने त्यांचा स्वाभाविक पुढारी असतो. गावकीचा कारभार पाहण्यासाठी व या कथित सरकार मंडळींना बाजूला सारून पाटलांना पुढे आणण्यासाठी महाराजांनी बळ दिले. कोल्हापूरातील विद्यार्थी वसतीगृहांमध्ये तरुण पाटलांना त्यांच्या कर्तव्याचे ज्ञान करून देण्यासाठी व पाटीलकीचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष वर्ग सुरू केले होते. पुढे याच वर्गाचे रूपांतर महाराजांनी “दिल्ली दरबार पाटील स्कूल” मध्ये केले. मुंबई येथे भव्य पाटील परिषद देखील महाराजांनी आयोजित केलेली होती.

स्वतःचे असे काहीएक कर्तृत्व नसताना केवळ पूर्वपुण्याईवर मोठेपणा मिरवणाऱ्या व सर्वसामान्यांवर अंमल गाजवण्याची खुमखुमी असणाऱ्या दोन कथित सरकार मंडळींचा शाहू महाराजांनी चांगलाच माज उतरवल्याची एक आठवण भाई माधवराव बागल यांनी लिहिलेली आहे. ती अशी,

एके दिवशी शाहू महाराज त्यांचेकडील एक साधी फोर्ड मोटार घेऊन शहरात निघाले. महाराज स्वतः गाडी चालवत होते तर गाडीमध्ये बांधकामावरील डाकवे मिस्त्री, महाराजांचे हुजरे, पागेवरील कामगार, पापा परदेशी, आबालाल रेहमान व खंडेराव बागल यांना अगदी दाटीवाटीनेच बसवले होते. गाडीमध्ये आता लहान मुल बसण्याइतकीही जागा नव्हती. अशी ही गाडी घेऊन महाराज थेट एका मोठ्या सरकाराच्या बंगल्यावर गेले. स्वतःच त्याला हाक मारली. म्हणाले, चल बरोबर. त्याला गाडीत कुठे बसावे कळेना ! महाराजांनी गाडी सुरुही केली. गडबडीत हा सरकार तसाच गाडीच्या दरवाजाला लटकला. तशीच गाडी घेऊन महाराज दुसऱ्या सरकारच्या बंगल्यावर गेले. त्यालाही चल म्हणाले. पहिल्या सरकारला पाहून तोही तसाच दुसऱ्या दाराला लटकला. गाडीला लोंबकळणारे हे सरकार घेऊन गाडी शहरात गेली. शाही पोषाखातील हे मिजासखोर सरकार गाडीला लोंबकळत उभे राहिलेत आणि फाटकातुटका पोशाख केलेली, साधी गरीब माणसं माणसं मात्र गाडीत बसलेत. गंमत म्हणजे अशा या गाडीची मिरवणूक साऱ्या गावभर काढून, लटकलेल्या सरकारांना नुसतंच फिरवून तसंच बंगल्यावर सोडून दिलं. गावभर या सरकार जमातीची चांगलीच शोभा झाली. जनतेला ऐरीगैरी समजणाऱ्या या बढाईखोर सरकारांचा माज उतरवला. जनता कमी दर्जाची नाही, मी तुमच्यापेक्षा त्यांना जास्त मानतो, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले.

राजर्षी शाहू महाराजांचे नातू मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराजांनी अशाच एका प्रसंगी या सरकार मंडळींना मांड्या घालून जमिनीवर बसायला लावले होते आणि सर्वसामान्य लोकांना महाराजांनी खुर्च्यांवर बसवले होते, अशी आठवण कोल्हापुरातील जुनी मंडळी सांगतात.

आजच्या काळातही अशी एखादी कृती करण्याची वेळ परत आली आहे की काय, असे वाटते. लोकशाही असल्याने या कथित सरकारांचे अस्तित्व आता मावळले आहे. मात्र पावसाळ्यात जशी बेडकं वर येतात, तसे पारंपारिक कार्यक्रमांत हे सरकार लोक अचानक प्रकट होतात. एरवी बिळात असणाऱ्या या बेडकांची कोल्हापुरातील पारंपारिक धार्मिक कार्यक्रमांत भाविकांवर व छत्रपती प्रेमींवर डराव डराव पाहायला मिळते. आता भारतात लोकशाही आहे, कोल्हापूरचे छत्रपती हे लोकराजे आहेत आणि कोल्हापूरचे पारंपारिक धार्मिक कार्यक्रम हे लोकोत्सव आहेत. या लोकोत्सवातून लोकांनाच दूर ढकलणाऱ्या ढकलकरी बेडकांना लोकांनीच जागा दाखवली असती, मात्र छत्रपतींकडे पाहून लोक संयम ठेवतात, त्याचा हे अतीच गैरफायदा घेताना दिसतात. कोल्हापूरच्या लोकोत्सवाला बाधा आणणाऱ्या, सर्वसामान्य जनतेला त्यांच्या लाडक्या छत्रपतींपासून व आराध्य दैवतापासून दूर ढकलणाऱ्या या एकदिवसीय तथाकतीत सरकार कुप्रवृत्ती ठेचण्यासाठी आजच्या काळातही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचीच गरज आहे..!

यामध्येही स्वकर्तृत्व असणारे, जनतेशी नाळ व छत्रपतींशी निष्ठा असणारे सन्माननीय अपवाद देखील निश्चितच आहेत. हे अपवाद वगळले तर बाकीच्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांचेच एक विधान आजही लागू पडते, “ही सरकार मंडळी केवळ दरबारी शोभेची बाहुली आहेत, याउपर त्यांचा काडीमात्र उपयोग नाही !”

ऐतिहासिक संदर्भ :
श्रीमच्छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र, प्रो. लठ्ठे, पान २१२ ते २१८, पान २८६,२८७

06/01/2023

"हिंदूपदपातशहा क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज शाहू छत्रपती"
महाराष्ट्राच्या समाजकारणावर, राजकारणावर व समाजमनावर अधिराज्य गाजवणारे आणि आपल्या कार्यातून अलौकिक ठसा उमटवणारे, १९ व्या शतकातील महान राज्यकर्ते म्हणजे "राजर्षी शाहू छत्रपती" महाराज.
सतराव्या शतकात अन्यायाने पिचलेल्या भूमिपुत्रांत स्वाभिमान जागृत करून प्रस्थापित जुलमी सत्तांच्या विरोधात ज्वाजल्य देशप्रेमाचा हुंकार फुलविणाऱ्या युगपुरूष शककर्ते श्री शिवछत्रपती महाराजांचे ते वंशज. महाराजांनी निर्माण केलेला जनकल्याणाचा वसा आणि वारसा समर्थपणे पेलणारे राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचेही कार्य पूर्वजांच्या किर्तीला साजेसेच होते.

छत्रपती शाहू महाराज ज्या धर्मात जन्माला आले, त्या हिंदू धर्माविषयी त्यांची मते काय होती. याचा थोडक्यात आढावा घेणे फार आवश्यक आहे. कारण आजच्या परिस्थितीत "शाहू महाराजांचे विचार" म्हणून काही लोक स्वतःचे विचार महाराजांच्या नावाने खपविण्याचा उद्योग करत आहेत. महाराजांचे हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा याविषयींचे विचार त्यांच्याच भाषणातून, पत्रांतून, आज्ञापत्रातून जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न...

महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राम्हणेतर वाद फार पूर्वीपासून आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या आयुष्यात वेदोक्त प्रकरण घडले आणि या वादाला मोठी चालना मिळाली. कर्मठ, दुराग्रही व स्वतःला धर्मपंडीत आणि सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या या लोकांमुळे महाराष्ट्राच्या धर्मकारणालाच वेगळी दिशा मिळाली ; त्याचं निर्विवाद नेतृत्व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी केलं. त्या घटनेचे पडसाद आजही उमटत असतात.

पण, राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची नेमकी भूमिका काय होती, याचा अभ्यास न करता अथवा अभ्यास असूनही जाणीपूर्वक काही डाव्या व स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या लोकांनी शाहू महाराजांचा हिंदू परंपरेला, देवदेवतांंना, कर्मकांडाला विरोध होता असे चित्र उभे केले. परंतु महाराजांच्या चरित्राचा तटस्थपणे अभ्यास करताना यातील फोलपणा स्पष्टपणे उघडकीस येतो.

महाराजांनी तत्कालीन सर्व विचारधारांचा उपयोग समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी केला. परंतु आपल्या घराण्याच्या प्रथा - परंपरा कटाक्षाने पाळल्या. सत्यशोधक समाजाला प्रोत्साहन देत असतानाच राजर्षी शाहू महाराजांनी आर्य समाजाला आपलंसं केलं होतं. वेदोक्त प्रकरण घडले म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी वेद नाकारले नाहीत ; तर सर्व हिंदू समाजाला वेद खुले व्हावेत यासाठी शिवाजी वैदिक स्कूल चालू केले. त्यांनी सतत वेदांचा आग्रह धरला.

गोहत्या बंदीसाठी राजर्षींनी कायदा केला होता. पण हि गोष्ट आज मुद्दाम लपवून ठेवण्यात येते. राजर्षी शाहू महाराज हिंदू समाजातल्या रूढी परंपरांना विरोध करत असत, असे चित्र उभे केले जाते. पण महाराज पूर्णतः आस्तिक होते. त्यांचा पूजाअर्चा, होमहवनला पाठिंबा असल्याचे दिसते. मात्र त्याचवेळी 'घोड्याचे मास खाल्ल्याने आपला धर्म बुडतो,' अशी भिती वाटणाऱ्या युद्धात अडकलेल्या आपल्या मराठा सैनिकांना, "यावेळी जीवंत राहणे महत्त्वाचे असून तुम्हास कोणीही जातीबहिष्कृत करणार नाही. मी छत्रपती म्हणून तुमच्या सर्व घरच्या कार्यास उपस्थित राहीन," अशी प्रेमळ सादही घालतात.

शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या आपल्या मुलांवर तिथल्या संस्कृतीचा प्रभाव पडेल, त्यामुळे आपल्या प्रथा परंपरा त्यांना माहिती पाहिजेत, असा आग्रह राजर्षी धरतात. राजर्षींच्या काळात काही लोक धर्मसुधारणांना विरोध करणारे, समाजाला घातक असणाऱ्या अनिष्ट रुढी परंपरा पाळणारे होतेच आणि यालाच जर कोण ब्राम्हणी धर्म म्हणत असेल तर सुधारणावादी हिंदूंचा त्याला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. परंतू राजर्षी छत्रपती शाहू महाराजच हिंदू व हिंदुत्वाच्या विरोधातच होते असा ज्यांचा आजपर्यंत दावा होता, तेच आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं हिंदुत्व मांडण्यास तयार झाले ही समाधानाची बाब आहे.

हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी वाव आहे, म्हणूनच आजपर्यंत हा धर्म टिकून आहे. मतांच्या राजकारणासाठी हिंदू धर्माला, प्रथा - परंपरेला नाकारणाऱ्या व त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना कम्युनिस्ट ठरविणाऱ्या लोकांचे यानिमित्ताने पुन्हा आम्ही स्वागतच करतो. हिंदूपदपातशहा श्री शाहू छत्रपती महाराजांच्या रूपाने द्वेष व दोषविरहीत हिंदूत्व मिळत असेल तर, त्याचा जास्त आनंदच आहे.

अखेर राजर्षी छत्रपती महाराजांनीच सांगितले आहे... #सत्याला_मरण_नाही !

26/09/2022

परंपरा वैभवाची...
महाराष्ट्राच्या अस्मितेची.

Want your organization to be the top-listed Government Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Kolhapur