Social Networking For Social Cause
Social Networking Forum (SNF) was founded in 2010 by Pramod Gaikwad (Nashik) in Maharashtra state. SN
18/12/2025
काल माझ्या आणि एसएनएफच्या सहकार्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला.
‘आदिवासी लयगाथा’ या माझ्या पहिल्याच पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि आयुष्यातील एक स्वप्न साकार झाले. आदिवासी जीवन, त्यांची समृद्ध संस्कृती आणि संघर्षातही आनंदाने जगण्याचा जीवनमंत्र यांचा वेध घेणाऱ्या या पुस्तकाला मान्यवर साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि रसिक वाचकांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा सन्मान मिळाला, हे माझ्यासाठी अत्यंत गौरवास्पद आहे.
या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी सह्याद्रीच्या दर्याखोर्यातून आलेल्या आदिवासी बांधवांची उपस्थिती हा अतिशय भावनिक प्रसंग होता. त्यांच्या लयबद्ध नृत्य-वादनाने, पारंपरिक वेषभूषेने आणि उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.
ज्या जीवनशैलीतून, संस्कृतीतून आणि संघर्षातून जी लयगाथा पुस्तकाच्या रूपात साकार झाली,
तीच लय प्रकाशन सोहळ्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे हेच या पुस्तकाच्या प्रकाशनाचं खऱ्या अर्थानं यश आहे.
‘आदिवासी लयगाथा’ या पुस्तकाचा एक खरा हिरो म्हणजे वाघनखी पाड्याचे धुमबाबा... म्हैसमाळ येथील एसएनएफ पाणी प्रकल्पासाठीएक रुपयाही न घेता त्यांनी आपल्या शेतातील जागा दिली. आम्ही लोक पाणी विकत नाही म्हणाले होते ते. जेव्हा त्यांना सन्मानाने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला, तो क्षण कालच्या संपूर्ण सोहळ्याचा सर्वोच्च क्षण ठरला. संपूर्ण सभागृहाने उभे राहून टाळ्यांच्या गजरात आमच्या या हिरोला दिलेली मानवंदना आयुष्यभर लक्षात राहील.
या सोहळ्याला शुभहस्ते उपस्थित राहिलेल्या
मा. श्री. रंगनाथ पठारे,
पद्मश्री सौ. राहिबाई पोपेरे,
खासदार भास्करराव भगरे,
डॉ. कांतीलाल टाटीया,
कुलगुरू प्रा. संजिव सोनवणे
या सर्व मान्यवर मार्गदर्शकांची उपस्थिती माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारी ठरली.
माझ्यावर विश्वास ठेवून ‘आदिवासी लयगाथा’ हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल शब्दालय प्रकाशन आणि विशेषतः सुमती ताई, सुमित व मृण्मयी लांडे यांचे मनःपूर्वक आभार.
या प्रवासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ दिलेल्या प्रत्येकाचे ऋण शब्दांत मांडणे अशक्य आहे. माझ्या लेखनाला अर्थ देणाऱ्या त्या प्रत्येक आदिवासी बांधवांना, त्यांच्या संस्कृतीला आणि त्यांच्या लयीला मनापासून नमन 🙏
ही लयगाथा आपल्यापर्यंत पोहोचली ही मला खुप समाधान देणारी घटना आहे.
आपल्या शुभेच्छा आणि प्रेम असेच कायम राहू द्या… 🙏📖
— प्रमोद गायकवाड
ज्या मित्रमंडळीला प्रकाशन सोहळ्यास उपस्थित रहाता आले नाही त्यांच्यासाठी पुस्तक घेण्याची लिंक खाली देत आहे..
https://shabdalaya.com/product/adivasi-layagatha/
18/12/2025
धुळ्याचा उद्योजक मित्र प्रमोद पाटील याने माझ्या “आदिवासी लयगाथा” पुस्तकाच्या १०० प्रती विकत घेऊन ग्रामीण भागातील शाळांना देणार असल्याचे कळवले आहे. मनापासून आभार मित्रा प्रमोद 🙏 तुझ्या या कृतीमुळे दुर्गम भागातील पुढील पिढीला आपल्या प्राचीन सांस्कृतिक मूल्यांचे महत्व कळेल अशी आशा आहे .. तुझा हा पाठिंबा आदिवासी लयगाथाला नक्कीच बळ देणारा आहे. 🌿📚 आदिम लयीचा आरस्पानी अनुबंध आदिवासी लयगाथा लेखक - प्रमोद गायकवाड शब्दालय प्रकाशन नोंदणीसाठी संपर्क करा. 9011201414 https://shabdalaya.com/product/adivasi-layagatha #आदिवासीलयगाथा
12/11/2025
🚲 कुळवंडी माध्यमिक विद्यालयात १९ मुलींना नव्या सायकलींचे वाटप! 💚
नाशिक प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ संघटना यांच्या माध्यमातून SNF च्या सहकार्याने पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील कुळवंडी माध्यमिक विद्यालयातील १९ गरजू विद्यार्थिनींना नव्या सायकलींचे वितरण करण्यात आले.
कुळवंडी आणि परिसरातील ससूने, घनशेत, खराडीपाडा, हट्टीपाडा व कडवईपाडा या गावांमधील विद्यार्थिनींना दररोज ३ ते ६ किलोमीटर पायी शाळेत यावे लागत होते. वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने अनेकदा त्यांना शाळेला अनुपस्थित राहावे लागते. ही समस्या लक्षात घेत मुलींना सायकल देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नाशिक प्रसूतीशास्त्र संघटनेचे सदस्य डॉ. पंकज भदाणे आणि डॉ. समीर पवार यांच्या विशेष प्रयत्नातून दानशूर लोकांच्या सहकार्याने सायकल्स खरेदी करून १९ विद्यार्थिनींना सुपूर्द करण्यात आल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींचा प्रवास सुलभ होईल, शिक्षणासाठी अधिक वेळ मिळेल आणि त्या अधिक सक्षम होतील — हीच आमची खरी प्रेरणा! 🌻
उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टरांप्रती आणि दानशूर व्यक्तींच्या सामाजिक संवेदनशीलतेबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
डॉ. हार्दिक पटेल, डॉ. अभिजित कपोते, डॉ. अक्षय सारडा, डॉ. सुनील शेजवळ, डॉ. सागर दुकले, डॉ. अभिजित इंगळे, डॉ. अतुल अग्रवाल, डॉ. संदीप बढे, डॉ. सुदर्शन पाटील, डॉ. अभिषेक बागुल, डॉ. राहुल सोनावणी, श्री किशोर काळे, श्री. राजेश बोहरा, शिवशक्ती सायकल्स, गायत्री ट्रान्सपोर्ट
प्रमुख पाहुणे : स्त्रीरोग संघटना ट्रस्टचे चेअरमन डॉ. वसंत कवडे, SNF चे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, सरपंच सौ. नंदाताई सहारे, डॉ. समीर पवार, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. पंकज भदाणे, डॉ. मिलिंद भदाणे, डॉ. अपर्णा गुंजाळ, डॉ. प्रविणा पवार आणि डॉ. ऋषिकेश कुटे, डॉ. मोहन गायकवाड.
— प्रमोद गायकवाड
Social Networking Forum (SNF)
04/10/2025
काल पेठ तालुक्यातील करंजाळी येथे १२५ बालकांच्या कुपोषणमुक्तीचा जागर सुरु करून समाधानाने नाशिकला परतलोय...
जेंव्हा जेंव्हा आदिवासी भागात जातो तेंव्हा तिकडे दिसणारी कुपोषित मुलं बघून वाईट वाटतं. एकविसाव्या शतकातही आपल्या आयांच्या कुशीत विसावलेली ही कमी वजनाची बाळं बघावी लागणं तसं भूषणावह नाहीच पण व्यवस्थेला दोष देत आपण स्वस्थ बसून राहणंही योग्य नाही. याच भूमिकेतून गेली अनेक वर्षे एसएनएफ कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे. आमच्या या प्रयत्नांना अनेक मदतीचे हातही पुढे येत आहेत. त्यातूनच सोशल नेटवर्किंग फोरम, योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन, साऊथ मुंबई आणि ICDS यांच्या सहकार्याने पेठ तालुक्यात कुपोषण निर्मूलनासाठी एक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू झालाय. या उपक्रमातून १२५ बालकांना वर्षभर सकस आहार देऊन कुपोषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. अर्थातच यात अनेक अडचणीही येतील पण कोणते काम विना अडचण पूर्ण होते ? येतील त्या अडचणींवर मात करत पुढे जाण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
या उपक्रमासाठी वर्षभराकरिता २४ लाखांचा निधी उपलब्ध करून योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन, साऊथ मुंबई यांनी बळ दिले. ICDS चे अधिकारी पंडित वाकडे आणि त्यांच्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी ताईंचे या उपक्रमात विशेष सहकार्य लाभणार आहे. पेठ तालुका वैद्यकीय डॉ. मोरेही या कामात आपले योगदान देत आहेत. एसएनएफचे पेठ तालुका समन्वयक रामदास शिंदे यांनी वाटप आणि कागदपत्रांची पूर्तता यांची जबादारी घेतली आहे. एसएनएफचे मेडिकल प्रोजेक्ट प्रमुख डॉ. पंकज भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. डॉ. समीर पवार यांनी अतिशय अल्पदरात प्रोटीन पावडर उपलब्ध करून देण्यात मदत केली. मित्रवर्य राजीव भामरे यांनी अतिशय कमी दरात पोषण आहार उपलब्ध करून दिला. या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद.
योग विद्याचे श्री. शिवा मुथुस्वामी व श्री. शैलेश भेडा हे मुंबईहून येऊन करंजाळी येथे झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहिले व आम्हाला प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने पेठ तालुक्यातील बालकांना उज्वल आणि निरोगी भविष्य नक्कीच मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. 🌿
👉 चला, एकत्र येऊया आणि कुपोषणमुक्त पेठ तालुका घडवूया!
- प्रमोद गायकवाड
टिम सोशल नेटवर्कींग फोरम
Mob : 9422769364
Email : [email protected]
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
President, Social Networking Forum, Vithhal Charani Sankul, Opp Big Bazar, College Road
Nashik
422005