Pradeep Niphadkar BookLover

Pradeep Niphadkar BookLover

Share

I know some People can lose their entire lives in Libraries. And there are so many books but so little time in hand.

19/10/2024

ज्येष्ठ पत्रकार, प्रतिथयश लेखिका
अनुराधा औरंगाबादकर यांचे निधन

नाशिक- ज्येष्ठ पत्रकार, प्रतिथयश लेखिका आणि साप्ताहिक गांवकरीच्या सेवानिवृत्त सहसंपादक श्रीमती अनुराधा औरंगाबादकर (86) यांचे 18 ऑक्टोबरला रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कन्या प्रा.आम्रपाली औरंगाबादकर या आहेत.हंस मोहिनी नवल या मासिकाचे संपादक अंतरकर यांच्या कन्या आणि अरुणा अंतरकर यांच्या भगिनी होत.
पुण्याच्या प्रसिद्ध हंस प्रकाशनचे अनंत अंतरकर यांच्या कन्या असलेल्या डॉ.अनुराधाताई औरंगाबादकर यांनी 1970 मध्ये देशदूत पासून पत्रकारिते सुरुवात केली. यानंतर 1971 ते 1998 पर्यंत त्या साप्ताहिक गावकरीशी संलग्न होत्या. साप्ताहिक गांवकरीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक नवोदित लेखकांना त्यांनी विविध विषयांवर लिखाणासाठी प्रोत्साहित केले होते. एक प्रतिथयश लेखिका म्हणूनही त्या परिचित होत्या.त्यांची 90 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राशी त्या निगडित होत्या. नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या व्यवस्थापन समितीवरही त्यांनी काम बघितले. वृत्तपत्र विद्या पदवी परीक्षेत त्या पुणे विद्यापीठात द्वितीय तर तर केंद्रात प्रथम आल्या होत्या. नंतर काही वर्षे त्यांनी हंप्राठा महाविद्यालयात बीसीजेचे समन्वयक म्हणूनही धुरा सांभाळली. पीएचडी साठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता.

18/10/2024
25/09/2024

गेले ते दिन गेले ..
१९८३ मध्ये गझलेचे सादरीकरण करताना अस्मादिक.
तल्लीनतेने ऐकताना (डाव्याबाजूने) राजेंद्र शहा, संगीता जोशी, डॉ.ग़ुलाम दस्तगीर शिहाब , प्रो. डॉ. अमानत, दि ग्रेट हनीफ सागर,नश्तर अकबराबादी , फ़लक रुमान, दि ग्रेट ग्रेट सुरेशचंद्र नाडकर्णी.
आता शहा, संगीताबाई आणि मी जिवंत आहोत. बाकी सगळ्यांनी दयामाया न दाखवता सोडले आम्हाला. तरीही नाडकर्णी सर आणि सर्व शायरांनो तुमची आठवण चिंब करते अजूनही. लव्ह यू ऑल. एकेक माणसाबद्दल लिहिता येईल. बघू लिहू.. कधीतरी. वेळ मिळाला तर ......

17/09/2024

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि अजून एक कृपा करा.

उद्या अमुक इतके मोबाईल चोरीला गेले, अमुक पाण्यात बुडाले, अमुक इतक्या पाकिटाची चोरी झाली, अमुक माणसाचा डीजेमुळे हृदयविकाराने मृत्यू वगैरे बातम्या ऐकायला मिळणार नाही याची तजवीज करा.

Photos from Pradeep Niphadkar BookLover's post 31/08/2024

माझे 'बस्तिक' हे पुस्तक वाचून अनेक फोन नेहमीच येतात. पण मला कौतुक वाटते ते अश्या लोकांचे. हे पत्र आहे, त्रंबकेश्वरच्या संतोष भोई यांचे. पेशाने ते वकील असल्याने माझ्यासारख्या पापभिरू माणसाला वकिलाचे पत्र म्हणजे नोटीसच वाटली पण त्यांनी 'बस्तिक' वाचून पत्र लिहिले. ते तुम्ही वाचालच. त्यांचा सल्लाही वाचाल. पण कौतुक हे की आजही या जमान्यात लोकं आपल्या आवडत्या लेखकाला पत्र लिहितात. त्यासाठी वेळ काढतात, पाकिटात छान पैकी घडी घालून ते प्रेमाने ठेवतात, पोस्टाचे तिकीट (भले ते ५ रुपये असेल पण ) लावतात, पोस्टात जाऊन पोस्ट करतात. या सर्वांसाठी किती ते अमूल्य वेळ देतात. नुकतेच मी कर्जतचे दिलीप गडकरी यांनी केलेले माझ्या 'सुरेश भट आणि...' या पुस्तकाचे परीक्षण टाकले होते ते तुम्हाला आठवत असेलच. आता हे पत्र !

बा.सी. मर्ढेकर लयसिद्धांत मांडताना म्हणाले होते ,'' आधुनिक काळात मराठीत सांस्कृतिक महत्त्व काडी इतके नाही'' पण ते खोटे ठरते याची साक्ष वेळोवेळी येते. आमच्या महाराष्ट्रात सर्वत्र अंधाराच्या बातम्या येत असतीलही पण ''आमची रसिकतेची मिणमिणती पणती तेवत आहे. ती विझणार नाहीच. उलट हळूहळू तिची ज्योत अधिक प्रज्वलित होईल. तुम्ही फक्त लिहा '' असेच या घटना सांगतात. लिहिण्याला बळ येते. धन्यवाद गडकरी (कर्जतचे हं ) आणि वकीलसाहेब भोई. लवकरच उत्तर देतो.

02/08/2024

संस्कृतचे विद्वान, हिंदी कवी डॉ. हनुमंत मुजुमदार (वय ९०) यांचे काल निधन झाले. अत्यंत प्रेमळ असलेले डॉ. मुजुमदार मूळचे ग्वाल्हेर येथील पण गेले काही वर्षे पुण्यात स्थायिक झाले होते. ते माझ्याजवळ राहण्यास असल्याने नेहमी गप्पा होत असत. 'शब्द संहिता' हे त्यांचे पुस्तक त्यांच्या भाषाप्रेमाचे, संस्कृत प्रेमाचे प्रतीक आहे. डॉक्टर म्हणून ते ग्वाल्हेरला खूप लोकप्रिय होते. त्यांच्या 'ऋतूम गझलें ' या संग्रहाच्या प्रकाशनाला डॉ. सुनील देवधर आणि संजय भारद्वाज पाहुणे तर मी अध्यक्ष होतो. त्यावेळी त्यांनी अल्पावधीत पुण्यातल्या लोकांचा जमवलेला गोतावळा पाहण्यास मिळाला. माझे ग्वालेहरचे मित्र सुधीर कुशवाह माझ्या घरी आल्यावर त्यांना त्यांच्याकडे नेले होते. आपल्या माहेरचा माणूस भेटल्याचा काय आनंद त्यांना झाला होता. मग ग्वालेहरच्या कोणता तरी लाडूवाला आहे का इथपासून ते अनेक विषयांवर त्यांच्या गप्पा झाल्या होत्या. मुजुमदार अतिशय प्रेमळ आणि ज्याला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणावे असे होते. अशी माणसे दुर्मिळ असतात. डॉ. मुजुमदार यांच्या आत्म्यास शांती मिळो. त्यांच्या पत्नी व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका समिधा वहिनी , त्यांच्या तिन्ही मुली (रिचा, ऊर्जा आणि संहिता) यांना हे दुःख पचविण्यासाठी बळही मिळो !

(छायाचित्रात डावीकडून सुधीर कुशवाह, मी , डॉ मुजुमदार, सौ. मुजुमदार )

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Sinhgad Road
Pune
411051