Mind Vision Solutions
Enlighten Your Mind to Enhance Your Vision! One of our most successful ventures is PARAS (Passion Aimed Roadmap And Secrets).
*Teens बरोबर MUST-I - 16 🎳🎨🎯*
*आदिवासी आश्रमशाळा आणि भयमुक्त शिक्षण- भाग 3*
2018-19 दरम्यान आश्रमशाळांसाठी केलेल्या पायाभूत कामाबद्दल मांडते आहे... थोडे सविस्तर...
आश्रमशाळांमधील मुले-मुली बोलत नाहीत, अडचणीत असली तरी, आणि आनंदात असली तरी...
सोपी जीवनशैली ठरवली गेली होती... *घडणाऱ्या घटनांना मोठ्यांच्या अपेक्षांप्रमाणे प्रतिसाद देणे* एव्हढेच त्यांचे उद्दिष्ट.. पर्यावसान शक्यता एकच - *लहानपणी शोषण- शारीरिक आणि मानसिक ..., मोठेपणी प्रभाव - अहितकारी गट, संगत-सवयी यांचा...*
*हे कुठेतरी बदलवायचे तर मुळापासून काम करायला हवे होते. भीतीच्या जागी यायला हवा होता विश्वास.. सवय लागायला हवी होती विचार करण्याची, स्वत:चे विचार व्यक्त करण्याची, भावना समजून घेण्याची- इतरांच्या आणि स्वत:च्याही...* त्याचबरोबर *दृढ व्हायला हवा होता स्वत:वरचा विश्वास- शिकण्यातून, समजण्यातून, अभिव्यक्तीतून आणि आदर देण्यातून आणि घेण्यातून निर्माण होणारा विश्वास...* आव्हान स्वीकारले... हे सर्व घडू शकेल असे *वातावरण- संधी निर्माण करण्याचे* . जबाबदारी दिली *अ-भय अभियानाच्या गौरीताई, कल्याणीताई, संगीताताई, मिलिंददादा आणि संपूर्ण टीमकडे* . पायलट प्रयोगासाठी निवडली पुण्याजवळील *कोहिंड्याची आश्रमशाळा* - *मुख्याध्यापक सक्रीय..सपोर्टिंग* , आणि खूप लांब असली तरी त्यातल्या त्यात जवळ असलेली शाळा... उद्दिष्ट, साध्य स्पष्ट होतेच, *अपेक्षित वृत्तीबदल, वर्तनबदल याचे निकष ठरवले- विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षक- अधिक्षकांसाठीही...* तीन वर्षांच्या कार्यक्रमाची आखणी केली.
प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होणार होती. पहिल्या टप्प्यात होणार होती शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा- विधायक शिस्तीची संकल्पना- मूलतत्वे आणि अपेक्षित सहकार्य याविषयीची कार्यशाळा, इयत्ता पाचवीच्या वर्गावर आठवड्यातून एकदा असे वर्षभर प्रयोग हा दुसरा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या विषयशिक्षणामध्ये अडथळे दिसल्यास आवश्यकतेनुसार शिक्षकांचे प्रशिक्षण हा होता तिसरा टप्पा!
दोन दिवसीय कार्यशाळेत अपेक्षित ते घडले. शिक्षक, मुख्याध्यापक, शिपाई सगळेच अधूनमधून महत्त्वाच्या कामांसाठी आत बाहेर करत होते. मात्र संकल्पना समजून घेण्यामध्ये पुढाकार घेतला अधीक्षिका आणि काही निवडक इच्छुक शिक्षकांनी.... आणि सुरु झाला पायलट प्रयोग. वर्ग निवडला पाचवीचा आणि माध्यम निवडले वर्गसभा!
वर्गसभेसाठी वर्गातले सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मार्गदर्शक गोलात बसणार होते, जमिनीवर... *उतरंड सोडण्याचा पहिला टप्पा* .. वातावरण थोडे सैल व्हावे, मुलांना विषयात शिरता यावे यासाठी सुरुवात केली चित्रांनी ... गोष्टी ऐकल्यावर, गाणी म्हणल्यावर, नवीन माहिती घेतल्यावर मुलांनी चित्रांच्या माध्यमातून ते व्यक्त केले, चित्रकला येत असली तरी, येत नसली तरी... नंतरच्या गप्पांमध्ये मुले बोलली.. आपल्या चित्रांबद्दल... खरंतर *तोंडपाठ केलेल्या- ‘म्हणून दाखव रे ते भाषण’, ‘म्हण ग ती कविता’.. अशा ठराविक मुलांनी करायच्या गोष्टी सोडून ‘मनातले काहीतरी बोलणे’ प्रथमच घडत होते.* सुरुवात तर झाली...
गोष्ट ऐकून बोलणे थोडे जमू लागले पण स्वरूप मात्र ‘थोडक्यात सांगणे’ असेच होते. सर्वांच्याच वाचन- लेखन क्षमता पहिल्या- दुसऱ्या पातळीवर होत्या त्यामुळे पुस्तक वाचन, मनातले लिहिणे हे पर्याय तर बाद होते.. मुळात स्वयंप्रेरित, त्यात TRTI चेही प्रशिक्षण घेतलेल्या त्या अधीक्षिका मात्र चांगल्या तयार झाल्या. दोन दिवसीय कार्यशाळेनंतर त्यांनी रोज संध्याकाळी काही ना काही उपक्रम घ्यायला सुरुवात केली. अधीक्षकांचे पद रिक्त असल्यामुळे मुलगे मात्र त्यापासूनही वंचितच राहिले.
उपक्रम आणि प्रशिक्षणापेक्षाही इथे जास्त होती अडथळ्यांची शर्यत... अनेक प्रकारचे अडथळे - खूपच लांबचा प्रवास, खराब रस्ते, शिक्षक वेळेत उपलब्ध नसणे.. शाळेच्या परीक्षा, सुट्ट्या, पाऊस- रस्ते बंद असणे, अडचणीच अडचणी.. आणि एक अंतर्गत, अदृश्य अडथळा सांगू? आदिवासी विद्यार्थ्यांचा, त्यांच्या शिक्षणाचा प्रामाणिक कळवळा असणाऱ्या काही जुन्या अधिकाऱ्यांच्या शिस्तीविषयी काही धारणा होत्या. *छडी- लागट बोलणे, शिक्षा आणि त्या माध्यमातून अपेक्षित शिस्त यावर विश्वास असणाऱ्या अधिकाऱ्यांचा* विरोध, अंहं, *गैर-विश्वास* होता *‘प्रेमाने- आदराने मुले बिघडतात’, यावर..., ‘हे प्रयोग... नव्हे ‘थेरं’ आत्तापर्यंत निर्माण केलेल्या धाकाचा डोलारा कोसळवतील’ यावर..* त्यांचा दृश्य, अदृश्य, प्रामाणिक विरोध आणि या प्रॅक्टिकल अडचणी या सगळ्या पाठशिवणीच्या खेळातून ठरल्यापैकी काही वर्ग झाले.. परिणामही दिसू लागले. आणि हो, काही वेगळेच unplanned बदलही घडले.. प्रकल्पाच्या सुरुवातीलाच शाळेत पाणी आले, नियमितपणे स्वच्छता होऊ लागली, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन दुरुस्ती करून गेले, कचरा व्यवस्थापन यंत्रणा नियमित झाली, शाळेत यापूर्वीच मोठा TV, चांगले PC लागले होतेच, मुख्याध्यापकांच्या पुढाकाराने आधुनिक जिम तयार झाले होते, ग्रंथालयात पुस्तके येऊ लागली होती. उपक्रम सुरु झाल्यानंतर महिन्याभरातच नॅपकिन डीस्पोझल मशीन लागले... मुलांसाठी रोज दूध, केळी आणि अंडी येऊ लागली, रोज पोळ्या होऊ लागल्या... शासनाने लागू केलेल्या सर्व सोयी.. आणि गरजेच्या बाबींची पूर्तता होऊ लागली. यात कोणताही गैरकाम नसावे कदाचित *परंतु ज्या काही अडचणी होत्या त्या प्राधान्याने सोडवल्या गेल्या.. विद्यार्थी आणि त्यांच्या समस्या प्राधान्यक्रमावर आल्या.. हेही नसे थोडके*!
हवे होते *सातत्य. उपक्रमांचे आणि पुढाकार घेण्याचे* - *समस्या शोधण्यासाठी- समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे सातत्य...*
*मुख्याध्यापकांची प्रशिक्षणे पूर्ण झाली असती तर..? शाळेतले प्रयोग तीन वर्ष सातत्याने केले गेले असते तर..?*
*मा आयुक्त सरांबरोबर इतर अधिकाऱ्यांनाही या प्रयोगांची मूल्यं- तत्वं समजून घ्यावीशी वाटली असती तर...?*
*जुन्या अधिकाऱ्यांनी ‘थेरं’ या सरसकट नावाखाली ‘तुमचे- आमचे’ हा वर्णवादाच्या पॅकिंगमध्ये लपलेल्या ‘हार-जिती’ला इरेस नेले नसते तर...?*
*विद्यार्थ्यांच्या भय-मुक्त शिकण्यासाठी-जगण्यासाठी विधायक शिस्तीचा वापर-* *दृश्य परिणाम कधी दिसतील याची खात्री नसताना* *विश्वास आणि विचारांच्या बळावर मूलगामी प्रयोगांना सुरुवात करणे, त्याचा पाठपुरावा करणे सगळ्यांना जमेल..?*
*एका बाजूला अनुभवी विचारवंतांची टीम आहे.. दुसऱ्या बाजूला नितांत गरज आहे* .. आणि आहे विश्वास - कधीतरी यांचा मेळ घातला जाईल... सर्वांचा त्यावरचा विश्वास दृढावेल आणि मुख्य म्हणजे *मुलांना भयमुक्त जगण्याच्या संधी मिळू लागतील.. हेच ध्येय आहे.. हीच आहे अपेक्षा!*
*माधुरी यादवाडकर*
*संचालक*
*माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*९९२३०३२७७१*
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Pune
411021